गवळी शिवरा येथील 'तो' खून प्रेमसंबंधातील पैशाच्या वादातूनच

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गवळी शिवरा आरापूर रस्त्यालगत पडीक शेतात आढळलेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा पोलिसांनी काही दिवसांत उघड केला. तसेच आरोपीला अटक केली आहे.

२५ वर्षांच्या प्रेमसंबंधात पैशांवरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ५ मे २०२६ रोजी गवळी शिवरा ते आरापूर जाणाऱ्या रस्त्यालगत एका पडीक शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक गणेश काळे, धना गोंडे, हनुमंत सातपुते व स्वप्निल नरोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला,

महिलेच्या डोक्यावर गंभीर मारहाण करून खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. तपासात मृत महिलेची ओळख सुमन कडू काकडे (४६, रा. गवळी धानोरा, ता. गंगापूर) अशी पटली.

नातेवाईकांच्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांना देण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. तपासादरम्यान नातेवाईकांनी वामन माधव जगताप (५६, रा. गोपाळवाडी, ता. गंगापूर) याच्यावर संशय व्यक्त केला. गोपनीय माहितीदारांकडूनही मृत महिला व संशयित आरोपी यांच्यात मागील २५ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. महिला आरोपीकडे प्लॉट खरेदीसाठी सातत्याने पैशांची मागणी करत असल्याचे समोर आले.

९ मे रोजी आरोपी वैजापूर तालुक्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. ४ मे रोजी महिलेच्या प्लॉट व पैशांच्या मागणीवरून दोघांत वाद झाला. त्यानंतर आरोपीने मोटारसायकलवरून तिला गवळी शिवरा परिसरात नेऊन लोखंडी नळीने डोक्यावर वार करत खून केल्याची कबुली दिली. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक लक्ष्मण भोजणे, गणेश काळे, धना गोंडे, श्रीकृष्ण दाणी व हनुमंत सातपुते यांच्या पथकाने केली.